Type Here to Get Search Results !

दादाभाई नौरोजी मराठी माहिती ,सूत्रसंचालन, भाषण

दादाभाई नौरोजी मराठी माहिती ,सूत्रसंचालन, भाषण.


ब्रिटीशांकडून भारतीयांचे होणारे शोषण सर्वप्रथम जगासमोर मांडणारे, दादाभाई नौरोजी !

भारताला परकीय गुलामगिरीतून मुक्‍त करणा-या महापुरुषांमध्‍ये दादाभाई नौरोजी यांचे महत्‍त्‍वाचे स्‍थान आहे. 4 सप्‍टेबंर, 1825 रोजी मुंबईतील एका साधारण कुटुंबामध्‍ये त्‍यांचा जन्‍म झाला. आज त्‍यांची जयंती. यानिमित्‍ताने जाणुन घेऊया...दादाभाई नौरोजी आणि स्‍वातंत्र्या लढ्यातील त्‍यांच्‍या योगदानाबद्दल.. 

कौटुंबिक पार्श्‍वभूमी

- दादाभाई एका पारशी कुटुंबात जन्‍माला आले होते. त्‍यांचे वडील पुजारी होते. मात्र दादाभाई 4 वर्षांचे असतानाच त्‍यांच्‍या वडीलांचे निधन झाले. 
- त्‍यानंतर निरक्षर मात्र समजुतदार असलेल्‍या आईने दादाभाईंच्‍या उच्‍च शिक्षणासाठी धडपड केली. 
- दादाभाईदेखील लहानपणापासून अभ्‍यासू विद्यार्थी होते. त्‍यांनी उच्‍च शिक्षण मिळवले आणि वयाच्‍या 25व्‍या वर्षी मुंबईतील प्रतिष्ठित एलिफिंस्‍टन कॉलेजमध्‍ये प्राध्‍यापक म्‍हणून रुजू झाले. 1855 पर्यंत त्‍यांनी गणित आणि तत्‍वज्ञान हे दोन विषय शिकवले. 

सामाजिक कार्य 

- दादाभाई सामाजिक कार्यांमध्‍ये आवर्जून सहभागी होत. त्‍यांचे म्‍हणणे होते की, 'आपण समाजाच्‍या मदतीनेच प्रगती करत असतो. त्‍यामुळे आपण समाजाची मन:पूर्वक सेवा केली पाहिजे.' 
-  'भारतीय कोणत्‍या हलाखीच्‍या परिस्थितीत जीवन जगत आहे, याची माहिती इंग्‍लडमधील इंग्रजांना झाली पाहिजे. जेणेकरुन आपल्‍या स्‍वातंत्र्य लढ्याला त्‍यांची सहानभुती राहिल', असे दादाभाई नौरोजींचे मत होते.
- यासाठी इंग्‍लंडमध्‍ये जाण्‍याची संधी त्‍यांना लवकरच मिळाली. एका भारतीय कंपनीचे लंडनमध्‍ये खुलणा-या शाखेचे कामकाज पाहण्‍यासाठी ते लंडनला गेले. 
- लंडनमध्‍ये कंपनीचे कामकाज पाहत असतानाच तेथील भारतीय विद्यार्थ्‍यांच्‍या अडचणी सोडवण्‍याचेही ते काम करायचे. 
- पुढे या कंपनीमालकांसोबत वाद झाल्‍याने दादाभाईंनी कंपनीचे काम सोडले आणि 1859 साली स्‍वत:ची 'नौरोजी अँड कंपनी' ही कंपनी स्‍थापन केली. या कंपनीतर्फे कापसाचा व्‍यापार केला जायचा. 

राजकारण 

- यादरम्‍यान दादाभाई नौरोजींच्‍या संपर्कात फिरोजशाह मेहता, मोहनदास करमचंद गांधी आणि मोहम्‍म्‍द अली जिना असे विद्यार्थी आले. 
- दादाभाईंनी लंडनमध्‍ये 'इंडियन सोसायटी' आणि 'ईस्‍ट इंडिया असोसिएशन' या दोन संस्‍थांची स्‍थापना केली आणि भारतीयांच्‍या हलाखीबद्दल लेख लिहून इंग्रजांचे ध्‍यान आकृष्‍ट केले. 
-  ब्रिटीश शासन भारताचे कशा पध्‍दतीने आर्थिक शोषण करते याची सर्वप्रथम मांडणी दादाभाई नौरोजींनी केली होती. 
- ब्रिटीश पार्लमेंटमध्‍ये किमान एका तरी भारतीयाला प्रतिनिधीत्‍व मिळाले पाहिजे, अशी मागणी दादाभाईंनी या काळात केली होती. अखेर ब्रिटीशांनी ही मागणी मान्‍य केली आणि दादाभाई नौरोजींचे तर्क आणि त्‍यांच्‍या प्रतिभेने प्रभावित होऊन त्‍यांना भारतीयांचे प्रतिनिधित्‍व करण्‍याची संधी दिली. 
- त्‍यानंतर ब्रिटीश संसदेमध्‍ये ब्रिटीशांच्‍या विरोधात अतिशय अभ्‍यासपूर्ण आणि रोखठोक अशी मते दादाभाई नौरोजी सातत्‍याने मांडत राहिले. ब्रिटीश संसदेत निवडून जाणारे दादाभाई नौरोजी हे पहिले भारतीय होते. 

स्‍वातंत्र्य लढ्यातील योगदान 

- 1881मध्‍ये दादाभाई नौरोजी भारतात परतले. येथे आल्‍यावर प्रथम त्‍यांनी शिक्षणाच्‍या प्रसारावर जोर दिला. 
- इंग्‍लडमधील कामगिरीमुळे ते प्रसिध्‍द झाले होते. दादाभाई नौरोजी हे मवाळ गटाचे नेते होते. मात्र जहाल नेते लोकमान्‍य टिळकही त्‍यांचा आदर करायचे. 
- भारतीय काँग्रेसच्‍या स्‍‍थापनेमध्‍ये दादाभाई नौरोजी यांची महत्‍त्‍वाची भूमिका आहे. 
- काँग्रेसचे 1886मधील कलकत्‍त्‍याचे अधिवेशन, 1893 मधील लाहोर अधिवेशन आणि 1906मधील कलकत्‍ता अधिवेशनाचे दादाभाईंनी अध्‍यक्षस्‍थान भूषविले आहे. 
- 1906च्‍या अधिवेशनामध्‍ये दादाभाईंनी सर्वप्रथम 'स्‍वराज्‍य' हा शब्‍द प्रयोगात आणला होता. इंग्रजांकडे त्‍यांची मागणी असायची की, 'आम्‍हाला भिक नको, न्‍याय हवा आहे.' 
- भारतात पक्षाच्‍या प्रचारासाठी दादाभाईंनी प्रचंड मेहनत घेतली. शेवटपर्यंत लेख लिहून, भाषणे करुन भारतीयांना जागृत करण्‍याचे काम करत राहिले. 
- दादाभाई नौरोजी हे प्रखर देशभक्‍त होते. इंग्‍लंडमधून भारतात आल्‍यानंतर ते शेवटपर्यंत भारतातच राहिले. वयाच्‍या 92व्‍या वर्षी 1917 साली त्‍यांचे निधन झाले. 
-  दादाभाई नौरोजींनी सर्वप्रथम भारतीयांच्‍या वेदना जगासमोर आणल्‍या. ते अशा महान देशभक्‍तांपैकी होते ज्‍यांनी भारताच्‍या स्‍वराज्‍याचा पाया रचला.  


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.