Type Here to Get Search Results !

श्री रामनवमी बद्दल मराठी माहिती,मराठी सण, मराठी निबंध, भाषण!

श्री रामनवमी बद्दल मराठी माहिती,मराठी सण, मराठी निबंध, भाषण!


रामनमवी चा मराठी इतिहास : 

तिथी : चैत्र शुद्ध नवमी
श्रीविष्णूचा सातवा अवतार श्रीराम याच्या जन्माप्रीत्यर्थ श्रीराम नवमी साजरी करतात. या दिवशी पुष्य नक्षत्रावर, माध्यान्ही, कर्क लग्नी सूर्यादी पाच ग्रह असतांना अयोध्येत श्री रामचंद्रांचा जन्म झाला.

श्रीराम हे हिंदू धर्मीयांचे आदर्श अन्‌ लाडक दैवत. जगकल्याणासाठी, धर्म रक्षणासाठी, दुष्टांच्या र्निदालनासाठी, भगवान महविष्णूंनी जे दशावतार घेतले, त्यामध्ये श्रीराम अवतार हा त्यांचा सातवा अवतार.
श्रीराम ह्यांचा अवतार झाला तो त्रेता युगांत. अयोध्येचा राजा दशरथ आणि त्याच्या तीन राण्या - कौसल्या, सुमित्रा अन्‌ कैकयी ह्यांना एकच दुःख होते. त्यांना पुत्र संतान नव्हते. राजगादीला वारस नव्हता. राज्याला राजपुत्र नव्हते. आपल्याला पुत्र संतान व्हावे म्हणून धर्मनिष्ठ राजा दशरथाने राजगुरूंच्या मार्गदर्शनाखाली पुत्रकामेष्टी यज्ञ केला. यज्ञदेवता अर्थात अग्निनारायण हे प्रसन्न झाले. त्यांनी राजाच्या हातात प्रसाद फळे दिली. तो प्रसाद भक्षण केल्यावर तीनही राण्यांना पुढे उचित वेळी चार पुत्र झाले. त्या राजपुत्रांची नावे राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न अशी ठेवली.
श्रीराम हे श्रीरामायण ह्या ग्रंथाचे नायक, एक आदर्श पुत्र-पति-बंधू, स्वामी, धर्मरक्षक आणि कर्तव्यदक्ष, प्रजा पालक. श्रीराम हे पितृवचन पालक, मातृभक्त, एकवचनी आणि आदर्श असं व्यक्तिमत्व होय.
श्रीरामांनी बालपणीच आपल्या गुरुंच्या यज्ञांचे, धर्माचे संरक्षण केले. दुष्ट राक्षसांचा संहार केला. अहिल्येचा उद्धार करून त्यांनी पतित पावन हे विशेषण खरं केलं. राजाजनकाच्या मिथिलानगरीत जाऊन शिव धनुष्याचा भंग केला. भुमीकन्या सीतेबरोबर विवाह केला. श्रीराम हे अयोध्येचे राजपद भुषवणार म्हणून सारी प्रजा आनंदांत असतानाच मातृ-पितृ आज्ञेचं पालन करीत त्यांनी चौदा वर्षाचा वनवास स्वीकारला. सीता हरणाच्या निमित्त्याने लंकाधिपती रावण आणि त्याची राक्षस सेना ह्यांचा वध केला.
मर्यादा पुरूषोत्तम हे श्रीरामांचे आणखी एक वैशिष्ट्य. श्रीरामाचे जीवन, त्यांची कर्तव्य निष्ठा, संयम, शौर्य, औदार्य हे सारं सारंच कसं अगदी वंदनीय आणि आचरणीय.
ह्या आदर्श देवाताराची आपल्याला सदैव आठवण रहावी तो आदर्श आणि ते गुण आपण काही अंशी तरी आपल्यात उतरावेत म्हणून हे रामजन्माचे निमित्य. रामनवमी म्हणजेच राम जन्माच्या दिवशी मठ-मंदिरात भजन, पूजन, किर्तन, प्रवचन इ. कार्यक्रम करून हा जन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो. काही ठिकाणी तर गुढीपाडवा ते रामनवमी ह्या काळांत रामायण ग्रंथाचे वाचन, रामकथेचे निवेदन, गीत रामायणाचे गायन इ. कार्यक्रम ही केले जातात. मध्यान्ह काळी म्हणजे दुपारी बारा वाजता रामजन्माचा पाळणा म्हणून हा राम जन्मोत्सव केला जातो. सुंठवडा वाटला जातो.

रामनमवी चे महत्त्व :


 देवता व अवतार यांच्या जन्मतिथीला त्यांचे तत्त्व भूतलावर जास्त प्रमाणात कार्यरत असते. श्रीराम नवमीला श्रीरामतत्त्व नेहमीपेक्षा १००० पटीने कार्यरत असते. श्रीराम नवमीला `श्रीराम जय राम जय जय राम ।' हा नामजप, तसेच श्रीरामाची अन्य उपासना भावपूर्ण केल्याने श्रीरामतत्त्वाचा जास्तीतजास्त लाभ मिळण्यास मदत होते.

राम शब्दाचा अर्थ काय आहे ?​ | Meaning of word RAM


राम चा अर्थ आहे स्वयंप्रकाश,अंतःप्रकाश,स्वतःच्या आतील प्रकाश.’रवि’ चा अर्थ देखील तोच आहे. र म्हणजे प्रकाश, वि म्हणजे विशेष.याचा अर्थ आहे आपल्या आतील शाश्वत प्रकाश!म्हणजे आपल्या आत्म्याचा प्रकाश म्हणजे राम.

रामनवमी आणि राम जन्माचे गूढ ज्ञान |Knowledge behind Ram navami and Ram janm


’राम नवमी’ आपल्यातील दिव्य आत्मप्रकाश प्रकटीप्रित्यर्थ साजरी केली जाते.भगवान रामाचा जन्म राजा दशरथ आणि राणी कौसल्येच्या पोटी झाला होता.
कौसल्या म्हणजे कौशल्य आणि दशरथ चा अर्थ ज्याच्याकडे दहा रथ आहेत.आपल्या शरीराला दहा अंग आहेत,पंच ज्ञानेंद्रिय आणि (दोन हात,दोन पाय,जननेन्द्रिय(उत्सर्जन इंद्रिये) आणि तोंड अशी) पंच कर्मेंद्रिये.
सुमित्रा म्हणजे जी सदैव सर्वांसोबत मैत्रीभाव ठेवते.कैकयी म्हणजे जी सदैव सर्वाना निस्वार्थपणे देत रहाते.
अश्यातऱ्हेने राजा दशरथ आणि त्याच्या या तिन्ही राण्या एका ऋषीकडे गेल्या.त्या ऋषीने त्यांना दिलेल्या प्रसादामुळे आणि देवाच्या कृपेने भगवान रामांचा जन्म झाला.
राम म्हणजे अंतःप्रकाश, लक्ष्मण ( भगवान रामाचा लहान भाऊ ) म्हणजे सजगता.शत्रुघ्न म्हणजे अजातशत्रू आणि ज्याला कसलाही विरोध नाही.भरत म्हणजे योग्य,प्रतिभावान.
अयोध्या (येथे भगवान रामाचा जन्म झाला) म्हणजे असे स्थळ जे केंव्हाहि नष्ट होऊ शकणार नाही.

रामायणाचे सार​| Summery of Ramayana : 


या कथेचा मतितार्थ हा आहे, अयोध्या म्हणजे आपला देह.कार्यरत पाच ज्ञानेंद्रिये आणि पाच कर्मेंद्रिये यांचा  राजा आहे.कौशल्य याची राणी आहे.आपली इंद्रिये बहिर्मुख असतात, कौशल्यपूर्वक त्यांना अंतर्मुख करावे लागते.आणि जेंव्हा दैवी स्वयंप्रकाश म्हणजेच भगवान राम आपल्यात प्रकट होतात तेंव्हाच शक्य होते.
हिंदू पंचांगानुसार भगवान रामांचा जन्म नवमी दिवशी झाला आहे,त्याचेही महत्व आहे जे मी पुन्हा कधीतरी सांगेन.
जेंव्हा आपल्या मन(सीता)चे अहंकार(रावण) द्वारा अपहरण होते,तेंव्हा आत्म प्रकाश आणि सजगता(लक्ष्मण) यांच्या माध्यमातून भगवानांनी हनुमान(प्राण शक्तीचे प्रतिक)च्या खांद्यावर आरूढ होऊन त्याला स्वगृही परत आणले जाऊ शकते.हे रामायण आपल्या शरीरात सतत घडत असते.

रामनमवी चा उत्सव साजरा करण्याची पद्धत : 


`कित्येक राममंदिरांतून चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून नऊ दिवस हा उत्सव चालतो. रामायणाचे पारायण, कथाकीर्तन व राममूर्तीला विविध शृंगार, अशा प्रकारे हा उत्सव साजरा होत असतो. नवमीच्या दिवशी दुपारी रामजन्माचे कीर्तन होते. माध्यान्हकाळी कुंची (बाळाच्या डोक्याला बांधायचे एक वस्त्र. हे वस्त्र पाठीपर्यंत असते.) घातलेला एक नारळ पाळण्यात ठेवून तो पाळणा हालवतात व भक्‍तमंडळी त्यावर गुलाल व फुले उधळतात. (काही ठिकाणी नारळाऐवजी श्रीरामाची मूर्ती पाळण्यात ठेवतात. - संकलक) याप्रसंगी श्रीरामाचा पाळणा (रामजन्माचे गीत) म्हटला जातो.' त्यानंतर श्रीरामाच्या मूर्तीची पूजा करतात व प्रसाद म्हणून सुंठवडा देतात. काही ठिकाणी सुंठवड्याबरोबर महाप्रसादही देतात. या दिवशी श्रीरामाचे व्रतही करतात. हे व्रत केल्याने सर्व व्रते केल्याचे फळ मिळते, तसेच सर्व पापांचे क्षालन होऊन अंती उत्तम लोकाची प्राप्‍ती होते, असे सांगितले आहे.
*************************************************

🆕 श्री हनुमान चालीसा मराठी lyrics


रामनवमी का साजरी करतात?


चैत्र शुद्ध नवमी हा चैत्रातील नवरात्राचा नववा दिवस आहे. या तिथीस रामाचा जन्म झाला.हा दिवस रामनवमी म्हणुन साजरा करतात. त्या दिवशी दुपारी सूर्य डोक्यावर आल्यावर (दुपारी १२.०० वाजता) रामजन्माचा सोहळा होतो.रामाच्या चित्रास वा मूर्तीस इतर हारासमवेतच गाठी पण घालतात.रामज्न्म झाल्यावर फटाके फोडतात.त्यानंतर आरती करून प्रसाद वाटतात.
भारतीय संस्कृतीत हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो. रामनवमीचे एक व्रतही आहे. भगवान श्रीरामाचा जन्म चैत्र शुक्ल नवमी, गुरूवार, पुष्य आणि कर्क लग्नात झाला होता. विशेष म्हणजे, महाकवी तुलसीदास यांनी याच दिवशी
रामचरित मानस लिहण्यास सुरवात केली होती.

रामनवमी व्रत कसे करावे?


* व्रताच्या एक दिवस अगोदर सकाळीच लवकर स्नान आटोपून श्रीरामाचे नामस्मरण करावे.
* दुसर्‍या दिवशी (चैत्र शुक्ल नवमीला) ब्रह्म मुहर्तात ऊठून घर स्वच्छ करावे आणि आपले दैनंदिन कार्यक्रम लवकर उरकून घ्यावेत.
* त्यानंतर गोमूत्र, शुद्ध पाणी घरात शिंपडून घर पवित्र करावे.
* 'उपोष्य नवमी त्व यामेष्वष्टसु राघव| तेन प्रीतो भव त्वं भो संसारात् त्राहि मां हरे||' या मंत्राने ईश्वराप्रती व्रत भावना प्रकट करावी.
* त्यानंतर, 'मम भगवत्प्रीतिकामनया (वामुकफलप्राप्तिकामनया) रामजयंतीव्रतमहं करिष्ये' हा संकल्प करून काम- क्रोध-लाभ आणि मोहापासून अलिप्त होऊन व्रत करावे.
* मंदिर किंवा घराला तोरण आणि पताका लावून सुशोभित करावे.
* घराच्या उत्तर भागात रंगीत मंडप टाकून त्यात सर्वतोभद्रमंडलाची रचना करून त्याच्या मध्यभागी विधीपूर्वक कलश स्थापन करावा.
* कलशावर रामपंचायतन (त्यामध्ये राम-सीता, दोन्ही बाजूला भरत आणि शत्रुघ्न, लक्ष्मण आणि पदचरणी हनुमानाच्या सोन्याच्या मूर्ती किंवा चित्राची प्रतिष्ठापना करावी आणि त्यांची पूजा करावी.
* त्यानंतर विधीपूर्वक संपूर्ण पूजा करा.


रामनवमीच्या दिवशी काय करावे?


* या दिवशी संपूर्ण आठ प्रहर उपवास ठेवला पाहिजे.
* दिवसभर ईश्वराचे भजन-स्मरण, स्तोत्र-पाठ, हवन आणि उत्सव साजरा करावा.
* तसेच रामायण वाचणे आवश्यक आहे.
* या दिवशी मर्यादा पुरूषोत्तमाचे आदर्श अंगीकारण्याचा संकल्प करावा.
* प्रभु श्रीरामचंद्र चरित्र-श्रवण करून जागरण करा.
* दुसर्‍या दिवशी (दशमीला) पारायण करून व्रत सोडावे.
* गरीब आणि ब्राम्हणांना दान करून त्यांना जेवू घालावे.

रामनवमी व्रताचे फळ


* हे व्रत नित्य, नैमित्तिक आणि काम्य अशा तीन प्रकारचे आहे. नित्य होण्याबरोबर याला निष्काम भावना ठेवून आयुष्‍यभर केले तर आयुष्य आनंदमय होते.
* एखाद्या निमित्ताने हे व्रत केल्यास त्याचे यथेच्छ फळ मिळते.
* विश्वासाने हे व्रत केल्यास महान फळ मिळते.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad