महाशिवरात्री मराठी माहिती,मराठी निबंध, सूत्रसंचालन, भाषण ,मराठी सण माहिती!
माघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्र म्हणून पाळली जाते. या दिवशी उपवासाचे व्रत करतात. भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसर्या दिवशी व्रताची सांगता केली जाते. महाशिवरात्री माघ वद्य त्रयोदशीला महाशिवरात्री म्हणतात. महाशिवरात्रीचे व्रत हे काम्य व नैमित्तिक कात आहे.
महाशिवरात्री म्हणजे काय :
पृथ्वीवरील एक वर्ष म्हणजे स्वर्गलोकातील एक दिवस. शिव रात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतो. शिवाच्या विश्रांती घेण्याच्या काळाला `महाशिवरात्री’ असे म्हणतात.
महाशिवरात्री कथा :
शिव उपासनेमुळे माणसाच्या दृष्ट प्रवृत्ती कशा बदलतात, सदाचार, विवेक खऱ्या अर्थाने कसा जागा होतो, ह्या बद्दल ‘शिवलिलामृत’ मध्ये एक कथा आहे ती अशी की...
असाच एक महाशिवरात्रीचा दिवस. एक पारधी शिकार करायची म्हणून जंगलात गेला. जलाशयाच्या एका वृक्षावर जाऊन बसला. पाणी पिण्यासाठी म्हणून एखादं सावज आलं, एखादा प्राणी आला की त्याची शिकार करायची हा हेतू. दुपारपासून धनुष्य बाण सज्ज करून तो बसला खरा !… पण… दिवस गेला-संध्याकाळ झाली, सूर्य अस्ताला गेला, तिन्ही सांजा होऊ लागल्या तरी एक ही प्राणी त्या जलाशयाकडे आला ही नाही अन् शिकार मिळालीही नाही.
🌺 महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी
तेवढ्यात काही हरणं पाणी पिण्यासाठी म्हणून तिथं आली. पारध्याने धनुष्याची दोरी मागे खेचली. तो आता बाण सोडणार तोच त्या हरिणांचा प्रमुख पुढे आला आणि पारध्याला म्हणाला, हे पारध्या ! तू तर शिकारी आहेस. शिकार करणे हा तुझा धर्म आहे. तू आम्हाला मारणार हे ही खरं आहे. पण त्या आधी आमची एक विनंती ऐक. आम्ही एकदाच आमचं कर्तव्य पूर्ण करून येतो. आमच्या कुटुंबियांना भेटून येतो मग तू आम्हाला मार. खरं तर हातातोंडाशी आलेली शिकार जाऊ कशी द्यायची. पण त्या हरिणाच्या प्रमुखानी परत येण्याच वचन दिलं. तेव्हा पारधी म्हणाला “ठीक आहे उद्या सकाळच्या सूर्योदयापूर्वी मात्र तुम्ही आलं पाहिजे.”
हरिणाच्या कळपांनी ते मान्य केलं आणि ती निघून गेली. आता रात्र कशी काढायची. तोच दूरवरच्या मंदिरातून घंटानाद ऐकू आला. पाठोपाठ ॐ नमः शिवाय म्हटले. नकळत नाममंत्राची पारध्याला गोडी लागली. सहज चाळा म्हणून तो ज्या वृक्षावर बसला होता, त्याची पानं तोडून तो खाली टाकू लागला. तो नेमका बेलाचा वृक्ष होता. ती बेलाची पाने पारध्याच्या हातून नेमकी वृक्षाखालच्या शिवपिंडीवर पडत होती. नकळत त्याच्या हातून ती शिवपूजा घडत होती.
तोच ते हरिण आले आणि म्हणाले, “पारध्या सोड बाण, मी माझं कुटुंब प्रमुखाचं कर्तव्य पूर्ण करून आलोय. मला आता मार…” इतक्यात एक हरिणी पुढे येऊन म्हणाली. “त्याला नको मला मार, तो माझा पती आहे. त्याच्या आधी मला मार. मला माझा पत्नी धर्म पाळू दे.” तेवढ्यात ती पाडसं पुढे आली आणि म्हणाली त्या दोघांआधी आम्हाला मार. ते आमचे आई वडील आहेत. आम्हाला आमचा पुत्र धर्म पाळू दे. त्यांच रक्षण करू दे.
एका पाठोपाठ एक अशी प्रत्येकाचीच दुसऱ्याला वाचवायची व कर्तव्य दक्षतेची चढाओढ पाहिली अन पारध्याने विचार केला, हे प्राणी आपला धर्म कर्तव्य पाळतात तर मी का दयेचा धर्म पाळू नये. त्याची शिकार करून पापाचा धनी का होऊ. पारध्यानं सर्वानाच जीवनदान दिले.
भगवान शंकर प्रसन्न झाले. त्यांनी सर्वांचाच उद्धार केला. हरिणांना मृग नक्षत्र म्हणून अन् पारध्याला व्याघ्र नक्षत्र म्हणून आकाशात कायमचे स्थान दिले. हे घडले तो दिवस होता महाशिवरात्रीचा.
महाशिवरात्रीचे व्रत का करावे :
शिवाच्या विश्रांतीच्या काळात शिवतत्त्वाचे कार्य थांबते, म्हणजेच त्या काळात शिव ध्यानावस्थेतून समाधी-अवस्थेत जातो. शिवाची समाधी-अवस्था म्हणजे शिवाने स्वत:साठी साधना करण्याचा काळ. त्या काळात विश्वातील तमोगुण शिवतत्त्व स्वीकारत नाही. त्यामुळे विश्वामध्ये तमोगुणाचे प्रमाण किंवा वाईट शक्तींचा दाब प्रचंड वाढतो. त्याचा परिणाम आपल्यावर होऊ नये म्हणून शिवतत्त्व आकृष्ट करून घेण्यासाठी महाशिवरात्रीचे कात करावे.
व्रत आचरण्याची पद्धत व विधी :
उपवास, पूजा व जागरण ही या काताची तीन अंगे आहेत. शिवरात्रीच्या दिवशी एकभुक्त राहावे. शिवरात्रीला रात्रीच्या चार प्रहरी चार पूजा कराव्या, असे विधान आहे. त्यांना `यामपूजा’ असे म्हणतात. प्रत्येक यामपूजेत देवाला अभ्यंगस्नान घालून अनुलेपन करावे. शिवतत्त्व आकृष्ट करणारा बेल, पांढरी फुले व रुद्राक्षांच्या माळा शाळुंका व शिवपिंडीवर वाहाव्यात. धोत्रा व आंबा यांची पत्रीही या पूजेत वाहतात. तांदुळाच्या पिठाचे 26 दिवे करून त्यांनी शिवाला ओवाळावे. पूजेच्या शेवटी १०८ दिवे दान द्यावेत. प्रत्येक पूजेचे मंत्र वेगवेगळे असतात, त्यांनी अर्घ्य द्यावे. शिवस्मरणात जागरण करावे. पहाटे स्नान करून पुन्हा पूजा करावी. पारण्याला ब्राह्मणभोजन घालावे. ब्राह्मणांचा आशीर्वाद घेऊन कातसमाप्ती करावी.
शिवपूजेची वैशिष्ट्ये :
शिवपिंडीला थंड पाणी, दूध किंवा पंचामृत यांनी स्नान घालतात.
शिवाच्या पूजेत हळद-कुंकू वापरत नाहीत; मात्र भस्म वापरतात.
शिवपूजेत पांढऱ्या अक्षता वापरतात.
शिवाक्षाला तांदूळ, क्वचित गहू व पांढरी फुले वाहतात.
शिवपिंडीला पूर्ण प्रदक्षिणा न घालता अर्धचंद्राकृती प्रदक्षिणा घालतात.
महाशिवरात्रीला शिवाचा नामजप करण्याचे महत्त्व :
महाशिवरात्रीला विश्वात वाढणाऱ्या तमोगुणापासून रक्षण होण्याकरता शिवतत्त्व आकृष्ट करण्यासाठी शिवाचा `ॐ नम: शिवाय’ हा नामजप जास्तीतजास्त करावा.
महाशिवरात्री : माहिती आहेत का महाराष्ट्रातील या 5 ज्योतिर्लिंगाच्या खास गोष्टी :
हिंदू धर्मामध्ये महाशिवरात्रीला खूप पवित्र मानले जाते. महादेवाच्या विशेष उपासनेसाठी महाशिवरात्रीची ख्याती आहे.
हिंदू धर्मामध्ये महाशिवरात्रीला खूप पवित्र मानले जाते. महादेवाच्या विशेष उपासनेसाठी महाशिवरात्रीची ख्याती आहे. जीवनातील दुःख, अडचणी, पाप, आर्थिक समस्या दूर करण्यासाठी आजच्या दिवशी महादेवाची भक्तिभावाने उपासना केली जाते. प्राचीन काळापासून ऋषी-मुनींनी, देवतांनी, असुरांनी देवांचे देव महादेवाची तपश्चर्या करुन वरदान प्राप्त केले आहेत.
भारतामध्ये 12 प्रमुख ज्योतिर्लिंग असून यामधील पाच ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत. या सर्वांचे विशेष असे एक महत्त्व आहे. महाशिवरात्री च्या निमित्ताने आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील पाचही ज्योतिर्लिंगाची माहिती देत आहोत.
1. घृष्णेश्वर :
घृष्णेश्वर दर्शनासाठी सर्व पुरुषांसाठी एक खास नियम आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्यापूर्वी पुरुषांनी चामड्यापासून बनलेल्या सर्व वस्तू उदा. बेल्ट, पॉकेट मंदिराबाहेरच काढून ठेवणे आवश्यक आहे. पुरुषांनी कंबरेच्या वर घातलेले शर्ट, जॅकेट काढून ठेवावे लागते. या नियमाचे पालन केले तरच गाभाऱ्यात प्रवेश दिला जातो.
2. भीमाशंकर :
भीमाशंकर हे बारा ज्योतीर्लिंगापैकी एक आहे. भीमा नदीचे उगमस्थान असलेले हे क्षेत्र समुद्रसपाटीपासून 3500 फूट उंचीवर घनदाट जंगलाने वेढलेले आहे. भीमाशंकर मंदिर 1200 वर्षापूर्वीचे असून हे हेमाडपंथी बांधणीचे आहे. मंदिराच्या छतावर आणि खांबावर अतिशय सुंदर नक्षीकाम दिसून येते. मंदिर परिसरात शनि मंदिरही आहे. या क्षेत्राचा पुराणातही उल्लेख सापडतो.
3. औंढा नागनाथ :
हिंगोली जिल्ह्यातील पवित्र तीर्थक्षेत्र औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग मंदिरातील लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे महादेवाच्या पिंडीसमोर नंदीची मूर्ती नाही. नंदिकेश्वराचे स्वतंत्र मंदिर बाजूला आहे. मंदिराच्या आवारात 12 ज्योतिर्लिंगाची छोटी-छोटी मंदिरे आहेत.
4.परळीचे वैजनाथ :
देशभरातील बारा ज्योतीर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग म्हणुन परळीचे वैजनाथ प्रसिद्ध आहे. परळीच्या वैजनाथला दक्षिण काशी म्हणुनही संबोधले जाते. हे मंदिर मुळत: यादवकालीन असून मंदिराच्या जुन्या घाटात शके 1108 अशी नोंद आहे. मंदिराचे बांधकाम हेमाडपंती असून मंदिराचा जिर्णोध्दार इंदोरच्या राणी आहिल्याबाई होळकर यांनी केला.
5. त्र्यंबकेश्वर :
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी एक महत्त्वाचे ज्योतिर्लिंग आहे. या ज्योतिर्लिंगाचे वैशिष्ट्य म्हणजे शिवलिंगास ब्रम्हा, विष्णू, महेश या तिघांच्याही प्रतिमा आहेत. ब्रह्मगिरी पर्वताच्या निसर्गरम्य परिसरात त्र्यंबकेश्वर मंदिर वसले आहे.