20 मार्च जागतिक चिमणी दिना निमीत्त चिमण्याची मराठी माहिती,निबंध, सूत्रसंचालन!.
या चिमण्यांनो,
परत फिरा रे….
घराकडे आपुल्या…..
हे मा.ग. दि. माडगूळकर यांचे गाणे आजच्या दिवसाला लागू होते. हल्ली या चिमण्यांनो असेच म्हणावे लागते.
निसर्गाची ओळख मानवाला प्रथम चिमणीपासूनच होते. एक घास चिऊचा… सांगतच आपली आई आपणास एक-एक घास भरवते. कुठेतरी प्रत्येकाचे बालपणाच्या आठवणींशी चिऊताई जोडली गेलेली आहे. चिमणी काळाच्या ओघात दिसेनाशी झाली. आताच्या पिढीला चिमण्यांचा चिवचिवाट कानी पडणे दुर्मिळ झाले. कविता, बडबडगीते यांतच चिमणी शिल्लक राहते की काय अशी भिती वा़टू लागली आहे. शहरात मातीच्या भिंती, कौलारू घरे पहावयास मिळत नाहीत. अंगणात धान्य निवडणारी महिला आता दिसत नाही, अंगणही राहिले नाही तर अंगणात उड्या मारत धान्य टिपणारी , बागडणारी चिमणी कुठे दिसणार? सीमेंटच्या जंगलात वृक्षतोड मोठ्या प्रमाणात झाली. अपवादाने वृक्ष नजरेस पडतात.
कधी काळी चिमण्यांच्या चिवचिवाटाने होणारी घराघरातील सकाळ आता केवळ आठवणीतील एक अनुभूती झाल्याची स्थिती आहे. या पाश्र्वभूमीवर, चिमण्यांचे संरक्षण आणि त्याविषयीच्या जागृतीसाठी २० मार्च हा दिवस ‘जागतिक चिमणी दिन’ साजरा केला जातो. पहिला जागतिक चिमणी दिवस हा २० मार्च २०१० रोजी पाळला गेला. वाढत्या शहरीकरणामुळे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास चिमण्यांची संख्या कारणीभूत ठरला. एकीकडे मुंबई, पुण्यासारख्या महानगरात सामान्यत: आढळणारी चिमणी म्हणजेच ‘इंडियन कॉमन स्प्रॅरो’चेही दर्शन दुर्मीळ होत असताना पर्यावरण संवर्धनामुळे निमशहरी भागातील काही परिसरात विविध प्रकारच्या चिमण्या सकाळ-सायंकाळ गुंजारव करताना आढळतात. यासाठी आजच्या जागतिक चिमणी दिनाच्या निमित्ताने प्रत्येकाने आपल्या बागेत, परसात जर त्यांच्या खाद्याची व्यवस्था केली तर आपल्याला चिमण्या दिसू लागतील. याचा अर्थ असा नाही की, आज आपण ‘बर्ड फिड’ ठेवले आणि उद्या लगेच १०-१२ चिमण्या दिसतील लागल्या. चिमणीलाही ती सवय होण्यासाठी वेळ द्यावा लागतो. मात्र, यासाठी गरज आहे ती आपल्या इच्छाशक्तीची.
चिमण्यांनाही द्या जागा…
– फ्लॅट, घराच्या टेरेसवर, खिडकीत चिमण्यांसाठी दाणा-पाणी ठेवा. चिमण्यांना पाण्यात खेळायला प्रचंड आवडते.
– घरात काही वस्तूंची (बूट, चप्पल इत्यादी) रिकामी खोकी पडलेली असतात. त्यांना चिमण्या आत जाईल, असे भोक पाडून, घराबाहेर खिडकीच्यावर उंच जागेवर टांगले तर तेथे चिमण्या घरटे करतील.
– शीतपेयांच्या रिकाम्या बाटल्यांपासून त्यांना खाद्य भरवायचे फिडर बनवू शकतो.
– घराजवळच्या मोकळ्या भूखंडावर, कॉलनीतील रस्त्यांच्या कडेला लहान झुडुपवर्गिय रोपांची लागवड करा. व संवंर्धन करा.
– चिमण्यांसाठी नैसर्गिक अधिवास उपलब्ध करून देण्यासाठी बाभूळ वृक्षाची लागवड व संवर्धन करा. यावर चिमण्यांचा अधिवास मोठ्या प्रमाणात आढळून येतो. बाभूळावर त्या आनंदाने वास्तव्यास असतात.
– घराच्या टेरेस, बाल्कनीत कुंड्यात जेथे झाडे लावलेली आहेत अशा जागी बर्ड फिडर लावा. चिवचिवाटाने भकास, ओसाडपणा जाऊन जागेच्या सौंदर्यात भरच पडेल.
आज जागतिक चिमणी दिना निमीत्त चिमण्याची माहिती.
चिमणी
चिमणी (हाउस स्पॅरो) आणि पीतकंठ किंवा रान चिमणी (यलो थ्रोटेड चिमणी) अशा दोन प्रकारच्या चिमण्या आढळतात. त्यातील हाउस स्पॅरो अर्थात तुमच्या आमच्या परिसरात दिसणारी चिमणी सध्या कमी होत आहे. ही चिमणी प्रामुख्याने शहरात वास्तव्यास असते. मात्र, शहरी भागापेक्षा आता या चिमण्यांची संख्या ग्रामीण भागात मोठय़ा प्रमाणावर आहे. शहरीकरणाचा वाढलेला वेग, प्रदूषण आणि चिमण्यांना न मिळणारे खाद्य यामुळे हा चिवचिवाट कमी झाला आहे. चिमण्यांचे मुख्य अन्न म्हणजे बिया, भात, गहू, बाजरी हे आहे. मात्र, शहरात चिमणीला हे खाद्य मिळेनासे झाले. तेच गावाकडे घरातील महिला धान्य निवडतानाही चिमणीला ते घालते. त्यामुळे चिमण्यांची मुख्य गरज पूर्ण होते. त्यामुळे ग्रामीण भागात आजही हजारोंच्या संख्येने चिमण्या दिसतात.
रान चिमणी
शहरी भागात फारशी न आढळणारी चिमणी म्हणजे पीतकंठ चिमणी. याच चिमणीला रान चिमणी म्हणतात. ही चिमणी प्रामुख्याने नाशिक शहराबाहेरील जंगल परिसरात अढळते. विख्यात पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली यांना एकदा एक मृत चिमणी आढळली होती. त्यांनी तिला बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीत नेऊन परीक्षण केले असता ती हाउस स्पॅरो नसल्याचा निष्कर्ष निघाला. या चिमणीच्या मानेजवळ एक पिवळा ठिपका असतो त्यामुळे या चिमणीला पीतकंठ म्हणतात तसेच ती रानात दिसून येते त्यामुळे तिला रान चिमणीही म्हणतात. ही चिमणी प्रामुख्याने हरसूल, पेठ, इगतपुरी या भागात आढळते. रान चिमणीही आता काहीअंशी कमी होत चालली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे चिमणीची शिकार. रानावनात गलोरने चिमणीची शिकार केली जाते. रानावनातील नागरिकांमध्ये पक्ष्यांबद्दल असलेले अज्ञान, तसेच काही ठिकाणी अशा पक्ष्यांचा अन्न म्हणूनही वापर केला जातो. त्यामुळे चिमण्यांना पारध केले जात असल्याने अशा चिमण्याही कमी होत चालल्या आहेत. नेचर कॉन्झर्वेशन सोसायटी आणि वनविभागाच्या ग्रामीण भागात यासंदर्भात जनजागृतीचे गेल्या सात ते आठ वर्षांपासून काम सुरू आहे.
नर चिमणी
या चिमणीचे डोके राखाडी रंगाचे असते. तसेच तिचा गळा व डोळ्याभोवती काळा रंग असतो. ही चिमणी अंगाने भक्कम असते.
मादी चिमणी
ही चिमणी भुरकट राखाडी रंगाची असते. साधारणत: ताठ आणि सडपातळ बांधा या चिमणीचा बघायला मिळतो. चिमणीचा विणीचा हंगाम हा वर्षभर असतो.