Type Here to Get Search Results !

21 नोव्हेंबर ईद ए मिलादुन्नबी मराठी हिंदी माहिती

21 नोव्हेंबर ईद ए मिलादुन्नबी मराठी हिंदी माहिती




21 नोव्हेंबर ईस्लामी तिथीप्रमाणे 12 रबीऊल अव्वल अर्थात प्रेषित हजरत मुहम्मद साहेब यांची जयंती.ईद ए मिलादुन्नबी म्हणून ती जगभरात साजरी केली जाते . प्रथमतः आपणास पैगंबर हजरत मुहम्मद साहेब यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!   
                        
🌷 जाणून घेऊ या प्रेषित मुहम्मद 🌷

एक विख्यात गणिततज्ञ, अंतराळ शास्त्रज्ञ आणि इतिहासकर मायकल एच. हार्ट जगाच्या इतिहासात सर्वात प्रभावशाली ठरलेल्या १०० व्यक्तिमत्वांची अभ्यासपूर्ण यादी ‘द हंड्रेड’च्या नावाने प्रसिद्ध करतो. या यादीत महावीर १००व्या, लेनिन ८४व्या, अशोक ५३व्या, कार्ल मार्क्सला २७व्या तर गालीलीयो १२व्या स्थानी आहेत. यादीत चौथे स्थान बुद्धांना, तिसरे येशू ख्रिस्तांना, दुसरे न्यूटनला तर *पहिले स्थान प्रेषित मुहम्मद (शांती असो त्यांच्यावर)* यांना देण्यात आले आहे. स्वत: धर्माने ख्रिस्ती असणारा मायकल एच. हार्ट स्पष्टीकरण देताना म्हणतो, मी केलेल्या प्रेषित मुहम्मदांच्या निवडीने काहींना आश्चर्य झाले असेल आणि काहींना प्रश्न पडले असतील परंतु *प्रेषित मुहम्मद इतिहासातील एकमात्र व्यक्तिमत्व आहेत जे धार्मिक आणि धर्मनिरपेक्ष दोन्ही मैदानात एकाच वेळी सर्वाधिक यशस्वी ठरले आहेत.* प्रेषित मुहम्मद यांच्यावद्दल जाणून घेण्यासाठी मराठी भाषेत साहित्यच नाही. माधव विनायक प्रधान यांचे ‘प्रेषित मुहम्मद’, साने गुरुजी यांची ‘इस्लामी संस्कृती’ आणि एम. यु, कहाळे याचे ‘विश्व नायक’ हि मोजकीच पुस्तकं उपलब्ध आहेत, म्हणून मराठी जनतेला या विश्वनायकाची तशी ओळख झालीच नाही जशी व्हायला हवी होती.  या लेखाच्या माध्यमातून आपण प्रेषितांचे ऐतिहासिक योगदान पाहणार आहोत.

🌷 सामाजिक योगदान :

 प्रेषित मुहम्मद जगातील पहिले व्यक्तिमत्व आहेत ज्यांनी इतिहासात पहिल्यांदा समतेचा व्यवहारिक संदेश दिला. केवळ २३ वर्षाच्या कालावधीत त्यांनी या समतेवर आधारित समाज स्थापन करून जगाला दाखविला. राजाराम मोहन रॉय, महात्मा जोतीबा फुले, स्वामी विवेकानंद आणि बाबासाहेब आंबेडकर प्रेषित मुहम्मदांचा उल्लेख वारंवार समतेचा प्रणेता म्हणून करतात. अरब समाजात काळ्या गुलामांची खरेदी-विक्री केली जायची. जैद नावाच्या काळ्या गुलामाला आपली आत्या बहिण देऊन काळ्या-गोऱ्याचा भेद प्रेषितांनी नष्ट केला. जैद हरिसा नावाच्या गुलामाच्या घटस्पोटीतेशी विवाह करून तुच्छ समजल्या जाणाऱ्या घटस्पोटीतेला प्रेषितांची पत्नी बनण्याचा बहुमान प्रेषितांनी दिला. बिलाल नावाच्या तुच्छ समजल्या जाणाऱ्या गुलामाला काबागृहावर चढून अजाण देण्याचा आदेश देऊन कोणतीच वास्तू अपवित्र नसल्याचा संदेश प्रेषितांनी दिला आणि स्पष्ट केले कि *“आजपासून रानटीपणाच्या सर्व प्रथा आणि परंपरा मी माझ्या पायदळी तुडवीत आहे. कोणाला कोणावर कसलेही प्रभुत्व नसून सर्व समान आहेत, एकाच मानवाची संतान आहेत.”*

सर्वांना एकाच मानवाची संतान मानणे इस्लामच्या मुलभूत सिद्धांतापैकी आहे. जन्माच्या, रंगाच्या, वर्णाच्या, वंशाच्या आधारावर केला जाणारा भेद इस्लाम मुळापासून उपटून नष्ट करतो. मानवाची संतान या नात्याने सर्वांना समान हक्क, समान संधीची घोषणा इस्लामने आजपासून १४०० वर्षापूर्वी केली आणि समानतेवर आधारीत समाजाची स्थापना या जगाला करून दाखविली. स्वामी विवेकानंद म्हणतात, *“मुहम्मद पैगंबर आपल्या जीवनाने असा काही धडा घालून गेले आहेत कि त्यांच्या अनुयायांमध्ये मुसलमानांमध्ये संपूर्ण समता आणि बंधुत्व निरंतर नांदावयास हवे; त्यांच्यात जातीचा, मताचा, लिंगाचा आणि वर्णाचा भेद कदापि शिरू नये. तुर्कस्तानचा सुलतान आफ्रिकेतील गुलामांच्या बाजारातून एखादा निग्रो गुलाम विकत घेऊन त्याला साखळदंडांनी बांधून त्याला तुर्कस्तानात आणील आणि तोच गुलाम जर मुसलमान झाला आणि त्याच्या अंगात खरेच काही वकूब असेल तर सुलतानच्या शहजादीशी विवाह देखील करू शकतो. मुसलमानांचा हा उदारभाव कुणीकडे आणि तुम्हा लोकांची अमेरिकेतील निग्रो लोकांशी अमानुष वागणूक कोणीकडे?”* भारतात मुगल साम्राज्याचा महान अभियंता ठरलेला मलिक अंबर देखील एक गुलामच होता. त्याच्या सारख्या असंख्य गुलामांना आपले कर्तत्व दाखविण्याची संधी इस्लामने दिली.

एका ठिकाणी स्वामीजी म्हणतात, *“अन्य धर्मियांच्या तुलनेत मुसलमान लोक कितीतरी श्रेष्ठ ठरतात. जातीचा आणि वर्णाचा विचार न करता, सर्वांप्रती समभाव बाळगणे हे मुसलमानांचे उज्ज्वल वैशिष्ठ आहे.”* प्रेषित मुहम्मद याच्या संदर्भात भाष्य करताना स्वामीजी म्हणतात,  “आपल्या मनचक्षु समोर उभे राहतात समतेचे उद्गाते – प्रेषित मुहम्मद. तुम्ही कदाचित म्हणाल कि महमदांच्या धर्मात चांगले ते काय असणार? पण लक्षात ठेवा त्यांच्या धर्मात चांगले खचितच आहे. एरवी तो धर्म अजूनही टिकला कसा बरे असता? जे चांगले आहे तेच केवळ काळाच्या विनाशक शक्तीवर मात करत असते; इतर सर्व काळाच्या भक्षस्थानी पडले तरी ते मात्र टिकून राहत असते. *प्रेषित मुहम्मद समतेचे आचार्य होते, मानवजातीतील बंधुभावाचे प्रचारक होते, मुसलमानांतील भ्रातृभावेचे दीक्षागुरु होते.”* (स्वामी विवेकानंद ग्रंथावली, भाग ४, पृष्ठ १५९-१६०)

🌷 स्त्रियांसाठी योगदान :

ज्याकाळी जगातील श्रेष्ठ तत्वज्ञान स्त्रीमध्ये आत्मा असतो कि नाही? सारख्या गप्पा मारण्यात व्यस्त होते त्या काळात प्रेषित मुहम्मदांनी स्त्रीला सर्वच क्षेत्रात समान (एकसारखे नव्हे) अधिकार देऊन टाकले. प्रसिद्ध मार्क्सवादी भारतीय विचारवंत एम. एन. रॉय आपल्या ‘इस्लामचे ऐतिहासिक योगदान’ या पुस्तकात स्त्रीला माणूस म्हणून दर्जा देणारा धर्म ‘इस्लाम’ असल्याचा उल्लेख करून प्रेषितांच्या कार्याचा गौरव करतात. अरब समाजाच्या नसानसात भिनलेल्या, जन्मलेल्या मुलीला जिवंत पुरायच्या प्रथेला केवळ १३ वर्षाच्या कालखंडात प्रेषितांनी अशाप्रकारे हद्दपार करून दाखविले की मागील १४०० वर्षाच्या इतिहासात एकाही मुलीला केवळ मुलगी असल्यामुळे मारण्यात आलेले नाही. सच्चर समितीच्या रिपोर्टनुसार भारतीय मुस्लीम समाजात मुलींचे प्रमाण सरासरीपेक्षा जास्त आहे.

जगात महिलांसाठी इस्लाम एक क्रांतिकारक संदेश ठरला आहे. Harvard University च्या प्रख्यात जर्मन महिला प्राध्यापक Annemarie Schimmel म्हणतात कि, तुलनात्मक दृष्टीने पहिले असता असे दिसते कि इस्लामने महिलांना दिलेले अधिकार इतरांचा मानाने कित्येक पटीने पुरोगामी आहेत. प्रेषित मुहम्मदांनी आईला हा दर्जा दिला कि धर्मातील सर्वोच्च संकल्पना असलेला स्वर्ग आईच्या पायाखाली आणून ठेवला आणि “जन्नत मां के कदमो के नीचे” असल्याची शिकवण दिली. पत्नीला हा दर्जा दिला कि “तुमच्यापैकी सर्वोत्तम मुस्लीम तो आहे तो आपल्या पत्नीसाठी सर्वोत्तम पती आहे.” मुलीला हे स्थान दिले कि “ज्याला एक, दोन किंवा त्यापेक्षा जास्त मुली असतील आणि तो त्यांचे पालनपोषण न्यायोचित पद्धतीने करेल, तो स्वर्गात माझा शेजारी असेल” अशी शिकवण प्रेषितांनी दिली.

🌷 आर्थिक योगदान :

व्याजाच्या शापाने ग्रस्त झालेल्या समाजाला प्रेषितांनी सावकारी पाशातून मुक्त करून व्याजमुक्त अर्थव्यवस्थेचा संदेश दिला आणि केवळ १० वर्षाच्या कालखंडात व्याजमुक्त अर्थव्यवस्था प्रस्थापित करून दाखविली. अरब समाजात लोक सावकारी एक भयंकर पाप समजू लागले. केवळ व्याजाच्या नावाने सावकार थरथर कापू लागले. आपल्याकडे अधिक असलेली रक्कम लोक स्वत: दान करू लागले. पैसे उधार देऊन सोडून देऊ लागले. गरिबांना आणि गरजूंना मागण्याची परिस्थितीच कधी प्रेषितांनी येऊ दिली नाही. अरब प्रदेश पाहता पाहता आर्थिक दृष्ट्या इतका सधन-संपन्न झाला कि ज्याच्या आधारे अरब समाजातून दारिद्रीचा नाश झाला; जनता दान देण्यासाठी हातात रक्कम घेऊन फिरू लागली. मुस्लीम साम्राज्याने (इस्लामी नव्हे) जगावर १००० वर्षापेक्षा जास्त सत्ता गाजविली. या १००० वर्षात एकाही व्याजाच्या व्यवहाराची नोंद इतिहासात आढळत नाही. मुस्लीम शासनाला कधी कर्ज घ्यावे लागल्याची नोंद इतिहासात सापडत नाही. या उलट इतर शासनांना केलेल्या भरमसाठ मदतीच्या नोंदी आढळतात.
आज जगाला व्याजमुक्त अर्थव्यवस्थेची ओढ लागली आहे. व्याजाच्या पाशातून मुक्ती प्राप्त करण्यासाठी आज श्रमिक वर्ग व्याज्मुक्तीची मागणी करू लागला आहे. हल्लीच भारत सरकारने मुस्लीम समाजासाठी व्याजमुक्त बँकिंगची सुरुवात करण्याची घोषणा केली आहे. याचे भारतभर मुस्लीम समाजाने स्वागत केले आहे. तसेच इतर श्रमिक समाज देखील याची मागणी करू लागला आहे.

🌷 राजकीय योगदान :

 ज्या काळात राजेशाहीच एकमात्र राजकीय व्यवस्था होती त्या काळात प्रेषितांनी लोकशाहीची बीजे रोवली. मृत्यूशय्येवर असताना प्रेषितांनी आपल्यानंतर मुस्लीम समाजाचे नेतृत्व कोण करणार याची जबाबदारी मुस्लीम समाज प्रतिनिधीकडे सोपविली. आपल्यानंतर एखाद्या नातेवाईकाला जबाबदारी सोपवून घराणेशाही सुरु करण्याची संधी असूनही त्यांनी हि प्रथा लाथाडली आणि इस्लाममध्ये घराणेशाहीसाठी द्वारे कायमची बंद करून टाकली. मुस्लीम समाजाने प्रेषितांनंतर शेकडो वर्षे प्रेषितांनी दाखविलेला लोकशाही मार्ग अवलंबून दाखविला. हजारो वर्षापासून टोळीपद्धतीने राहणाऱ्या भटक्या अरब समाजाला एकसूत्र करून दाखविण्याचे श्रेय केवळ प्रेषितांचे. या समाजाला केवळ एकसूत्र करून न थांबता, या सर्व टोळ्यांना एकच समाज म्हणून मान्यता देऊन हि मान्य त्यांमध्ये केवळ १० वर्षात रुजवून दाखविणे आणि प्रातिनिधिक पद्धतीने आपल्या नेत्याची निवड करण्याची राजकीय प्रगल्भता या समाजात निर्माण करणे, सारेच अविश्वसनीय आहे. ज्या अरब समाजावर रोमन आणि पर्शियनदेखील सत्ता गाजवू शकले नाही त्या अरब समाजावर कसलीही सत्ता न देखील प्रेषितांनी आपले साम्राज्य निर्माण केले.

 प्रसिद्ध जर्मन इतिहासकार थोमास कार्लायल आपल्या ‘हिरोज अंड हिरो वर्शिप’ मध्ये म्हणतो, *“अल्पावधीत कसल्याही साहित्याच्या अभावी निर्विवाद एकहाती सत्ता गाजविणे हे केवळ दैवी देणगी आहे असे जर कोणी म्हणत असेल तर याचे श्रेय केवळ प्रेषितांना जाते. कारण अविश्वसनीय साम्राज्य केवळ त्यांचेच होते.”*

🌷 शैक्षणिक योगदान :

 प्रत्येक मुस्लीमसाठी मग तो स्त्री असो कि पुरुष, शिक्षण प्राप्त करणे अनिवार्य असल्याचा आदेश प्रेषितांनी दिला. आपल्या अनुयायांवर शिक्षणाची सक्ती करून शिक्षणाला प्रभुत्वाचे माध्यम असल्याचा दर्जा दिला. युद्धामध्ये पकडल्या गेलेल्या युद्ध कैद्यांना ठार करण्याची प्रथा प्रचलित असताना प्रेषितांनी हा पायंडा मोडून काढला आणि एक नवा पायंडा सुरु केला. युद्धामध्ये पकडला गेलेला कैदी जर मुस्लिमांना लिहिण्या-वाचण्याचे कौशल्य शिकवू शकत असेल तर तो मुक्त केला जी. याप्रकारे प्रेषितांनी मुस्लीम समाजाला प्रत्येक क्षेत्रात केवळ १० वर्षाच्या कालखंडात अग्रेसर करून ठेवले. रानटी आणि भटक्या लोकांचा अरब समाज, प्रेषितांच्या या जगातून निरोपाच्या वेळेस एक महान संस्कृती म्हणून उदयास आला होता. *एका नव्या संस्कृतीचा, ‘इस्लामी संस्कृतीचा’ जन्म झाला होता.*

 अशाप्रकारे प्रेषित मुहम्मद जगातील इतिहासात सर्वाधिक प्रभूत्वशाली व्यक्तिमत्व सिद्ध होतात. *त्यांच्या मुर्त्या आणि स्मारके नसताना आपल्या सिद्धांताच्या माध्यमातून ते जगावर आपल्या ‘न भूतो न भविष्याती’ प्रभाव टाकत राहतात.*

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad