महान स्वातंत्र्य योद्धा वीर उमाजी नाईक / Veer Umaji Naik
महाराष्ट्रभूमी ही स्वातंत्र्यप्रेमी योद्धा-रत्नांची खान आहे. मोगली सत्तेविरुद्ध स्वराज्याचा उठाव करत छ. शिवाजी महाराजांनी पहिले देशी राज्य स्थापन केले. पुढे इंग्रजांचा धोका लक्षात घेउन यशवंतराव होळकरांनी इंग्रजांविरुद्ध एकहाती युद्ध पुकारुन १८०३ ते १८१० या काळात तब्बल अठरा वेळा इंग्रजांना पराभूत केले. पण दुर्दैवाने त्यांचा १८११ साली अकाली मृत्यु झाला आणि स्वातंत्र्यलढा जवळपास थांबल्यात जमा झाला. १८१८ साली इंग्रजांची सत्ता देश गिळुन बसली. पण स्वातंत्र्याची आस मनी जागवत लढा स्वातंत्र्यलढा उभारायला महराष्ट्राच्या मातीतुन शिवाजी महाराज आणि यशवंतरावांपासून प्रेरणा घेत एक महावीर इंग्रजांशी सर्वकश युद्ध करायला उभा ठाकला...तो म्हणजे आद्य क्रातीवीर उमाजी नाईक!
७ सप्टेंबर १७९१ रोजी उमाजी नाईकांचा लक्ष्मीबाई व दादोजी खोमणे या रामोशी/बेरड दांपत्याच्या उदरी भिवडी (ता. पुरंदर) येथे जन्म झाला. वंशपरंपरेने पुरंदर किल्ल्याचे रक्षण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यामुळे त्यांना नाईक ही उपाधी होती. १८०३ साली दुस-या बाजीरावाने इंग्रजांचे अंकितत्व पत्करल्यानंतर इंग्रजांनी किल्ल्यांच्या रक्षणासाठी असलेली परंपरागत तरतुद नष्ट केली आणि रामोशी-बेरडांची हकालपट्टी केली.
शिवकाळापासुन गड-कोटांचे रक्षक असनारे रामोशी यामुळे हादरुन जाणे व इंग्रज सत्तेचा संताप येणे स्वाभाविक होते. हा समाज मुळात स्वतंत्रताप्रिय. त्यात उत्तरेत यशवंतराव होळकर इंग्रजांचा कसा धुव्वा उडवत आहेत या वार्ताही महाराष्ट्रात येतच होत्या. त्यापासुन प्रेरणा घेत उमाजींनी वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षापासुन क्रांतीकार्य सुरु केले. जेजुरीच्या खंडेरायासमोर आपल्या विठोजी नाईक, कृष्ण नाईक, खुशाबा रामोशी अशा काही मित्रांसोबत भंडारा उधळत इंग्रजी राज्य नष्ट करण्याची प्रतिज्ञा केली. पुढे मोजक्या सहका-यांसह इंग्रज, वतनदार यांच्यावर गनीमी काव्याने हल्ले करुन मिळालेली लुट गोरगरीबांत वाटायला सुरुवात केली. आयाबहीणींची अब्रू वाचवली. इंग्रज यामुळे अस्वस्थ होणे स्वाभाविक होते. त्यानी उमाजीवर खटला चालवून १८१८ साली एक वर्षाची शिक्षा फर्मावली. तुरुंगवासाच्या काळात उमाजी लिहायला-वाचायला शिकले. ते बाहेर आले ते मोठ्या उठावाची तयारी करुनच!
बाहेर आल्यावर त्यांने रामोशी-बेरडांची फौज उभी करायला सुरुवात केली. वाढता वाढता ही फौज पाच हजारांची झाली. डोंगर-कपा-यांचा आडोसा घेत त्यांने इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारले. अत्याचारांनी त्रस्त झालेले जनताही उमाजीला पाठिंबा देवू लागली. उमाजीला पकडणे ही इंग्रजांची प्राथमिकता बनली. सासवडच्या मामलेदार प्रशिक्षित असे इंग्रजी सैन्य घेवून उमाजीवर चालुन गेला. पण या युद्धात इंग्रजांना पराभव स्वीकारावा लागला. पाच इंग्रजी सैनिकांची मस्तके उमाजीने इंग्रजांनाच नजर म्हणुन पाठवली. यामुळे इंग्रजांचा भडका उडणे स्वाभाविक होते.
१८२४ साली उमाजीने पार पुण्यावर चाल केली. भांभुर्डा येथील इंग्रजांचा खजीना लुटला. ३० नोव्हेंबर १८२७ रोजी उमाजीने इंग्रजांना दरडावुन सांगितले...कि हा उठाव सर्वत्र पसरेल आणि इंग्रजांना या भुमीवरुन हाकलुन देईल. १८३० साली इंग्रज सेनानी बोईड हा उमाजीवर चालुन गेला...पण पराभव पत्करुन परत आला.
उमाजी नाइकांचे स्रवात मोठे आव्हान इंग्रजांसमोर उभे ठाकले जेंव्हा उमाजीने स्वातंत्र्याचा जाहीरनामा १६ फेब्रुवारी १८३१ रोजी प्रसिद्ध केला तेंव्हा. या जाहीरनाम,यानुसार उमाजीने आवाहन केले होते कि इंग्रजांच्या नोक-या सोडाव्यात, कसलाही कर भरु नये, संधी मिळेल तेथे उठव करावेत व इंग्रजी खजिन्याची लुट करावी. जो कोणी असे करंणार नाही त्याला नवे शासन शिक्षा करेल.
हा जाहीरनामा इंग्रजांच्या काळजात धडकी भरवणारा होता. ही स्वातंत्र्याची...स्वराज्याचीच घोषणा होती. उमाजी नवीन शिवाजी बनतो आहे हे इंग्रजांच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. उमाजीला हरप्रकारे कैद करुन संपवणे आवश्यक झाले. पण उमाजी सहजासहजी हाती येत नव्हता. उमाजीला जो पकडुन देईल अथवा त्याचा ठावठिकाना सांगेल त्याला दहा हजार रुपये व चारशे बिघे जमीन बक्षीस दिले जाईल असे इंग्रजांनी जाहीर केले.
महाराष्ट्राला शुरवीरांची जशी अवाढव्य परंपरा आहे तशीच फितुरीचीही! काळोजी नाईक आणि नाना चव्हाण हे दोन फितूर निघाले. भोर तालुक्यातील उतरोली या गांवी १५ डिसेंबर १८३१ रोजी ते बेसावध असतांना पकडण्यात आले. म्यकिंटोश हा इंग्रज अधिकारी तेंव्हा उपस्थित होता. उमाजी नाईकांवर देशद्रोहाचा खतला चालवण्याचे नातक करण्यात आले आणि पुण्यातील मामलेदार कचेरीसमोर ३ फेब्रुवारी १८३२ रोजी तत्काळ फासावरही चढवण्यात आले. स्वातंत्र्याची एक ज्योत विझली...
विनम्र अभिवादन...