Type Here to Get Search Results !

9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस मराठी माहिती भाषण सूत्रसंचालन

9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस मराठी माहिती भाषण सूत्रसंचालन.



वेगळी तुझी बोलीभाषा, धर्म तुझा आगळा
लाकडाचा केला नांगर, अन स्वता बैल झाला
ओबड-धोबड जमीन कसत, मैलो मैल चालला
सर्वांआधी जन्मला तरी मागं कसा राहिला ?
होतास भोळा अंगात ना-ना कला
अफाट कल्पनाशक्तीने फुलवलास मळा
देवा तुझा हा हिरवा निसर्ग तू जन्मापासून पुजला
सर्वांआधी जन्मला तरी मागं कसा राहिला ?
इतिहास रचला गेला, लिहिला गेला
पण तुझा उल्लेख ना कुठे दिसला
गड जिंकले गेले, तुझा इतिहास मात्र गाडला
सर्वांआधी जन्मला तरी मागं कसा राहिला ?

आदिवासी या नावाला फार प्राचीन इतिहास आहे. आदिवासी म्हटले की, आपल्यासमोर  डोंगर दर्‍यात राहणारा, जंगलात राहणारा, उघडा, नागडा असणारा, ओबड धोबड चेहर्‍याचा, जगाशी कुठलाही संपर्क नसणारा समाज येतो. जगाच्या पाठीवर ज्या माणसाने, ज्या जिवाने पहिल्यांदा जन्म घेतला तो जीव म्हणजे आदिमानव म्हणजेच आदिवासी. आज जगाच्या पाठीवर ज्या काही कला अस्तित्वात आहेत. त्या सगळ्या कलांचा उद्गाता आदिवासी आहे. आदिवासींची लोककला, चित्रकला, नृत्य, वादन, गायन, शिल्पकला याला तोड नाही. आदिवासी आजही आपली उपजीविका जंगलात मिळणार्‍या रानमेवाव्यावर करीत आहे. आजही गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती, ठाणे, किनवट, आदिलाबाद (आंप्र.) या भागात राहणारे आदिवासी बांधव जंगलाच्या जवळच राहणे पसंत करतात. ‘आदिवासी तेथे जंगल, जंगल तेथे आदिवासी’ असल्यामुळे निसर्गातील प्रत्येक वस्तूला ते दैवत मानतात. निसर्गावर त्यांची निस्सीम श्रद्धा आहे. संयुक्त राष्ट्रसंघटना आणि तिची सलग्न संस्था आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेने आदिवासींना ‘इंडिजिनस’ अर्थात देशज, मूळनिवासी असे संबोधावे अशी शिफारस केली आहे. संयुक्त राष्ट्रसंघटनाने जागतिक आदिवासी समुदायाच्या अधिकाराच्या रक्षणार्थ १९९३ हे जागतिक आदिवासी वर्ष घोषित केले होते. तसेच, ९ ऑगस्ट हा ‘जागतिक आदिवासी दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. आदिवासी हेच पृथ्वीचे मूळनिवासी आहेत आणि ४६१ आदिवासी जमाती भारतात वास्तव्यास आहेत. आदिवासींच्या जातीत आज आणखी काही जाती समाविष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या प्रेरणेने १९९४-२00५ हे ‘आदिवासी दशक’ म्हणून साजरा करण्यात आले.  भारतामध्ये प्रामुख्याने चेंचू इरुला, कदार, कोटा या निग्रो, प्रोटो ऑस्ट्रॉलॉईड या वांशिक जमाती केरळ, तमिळनाडू, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशात राहतात. मध्य भारतात बिहार, ओरिसा, मध्य प्रदेश, पं. बंगाल या राज्यामध्ये गोंड, संथाल, भूमजी, हो, ओरियन, मुंडा, कोरवा या प्रमुख जाती वास्तव्य करतात. राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, दमण-दीव, दादरा, नगर हवेली या राज्यांत आणि केंद्रशासित प्रदेशात भिल्ल या प्रमुख जमातीचे लोक राहतात. या व्यतिरिक्त कोळी, कोकणा-कोकणी, वारली, ठाकूर, कातकरी, आंध्र परधान, कोलाम, कोरकू, माडिया, गोंड, राज-गोंड या जमाती राहतात. आदिवासी हे हिंदू नाहीत, असा निर्णय न्यायालयाने एका प्रकरणात १९ जानेवारी १९७९ रोजी दिला आहे. आदिवासींमध्येही अनेक स्वातंत्र्यसैनिक होते होऊन गेले  क्रांतिकारक बाबूराव शेडमाके, नारायणसिंह उईके, राघोजी भांगरे , बख्त बुलंद शहा, दलपतशहा, रघुनाथ शहा, विरांगणा राणी दुर्गावती मडावी, कुमरा भीमा, या प्रत्येकाची शासनाने, पाठय़पुस्तक मंडळाने दखल घेतली पहिजे.
एकलव्याच्या कालापासून आदिवासी समाज अन्याय सहन करत आला आहे. अगदी इतिहासकारांनी देखील अन्याय करण्याचे सोडले नाही. इतिहासाच्या बाबतीत आदिवासी समाजावर झालेला अन्याय माझ्या कवितेतून उलगडण्याचा प्रयत्न केला...
जे आदिवासींसाठी लढले
ते आद्यक्रांतिकारक कुठे गेले?
जंगलात बहरलेला संसार
सोडूनी केला समाजाचा उध्दार
ते आदिम संस्कृतीसाठी जगले
जे आदिवासींसाठी लढले
ते आद्यक्रांतिकारक कुठे गेले?
आजचा इतिहासही रडेल
जेव्हा आदिवासी बलिदान बोलेल
ते मानवतेसाठी फासावर चढले
जे आदिवासींसाठी लढले
ते आद्यक्रांतिकारक कुठे गेले?

रावणाचे वंशज आजही आदिवासी म्हणूनच श्रीलंकेत ओळखले जातात अन त्यांना श्रीलंका शासनाकडून तशी वंशज म्हणून रक्कम अदा केली जाते .

आदिवासी मुलांनी आपल्या इतिहासातून प्रेरणा घ्यावी व आकाशात उंच भरारी घ्यावी म्हणून एक कविता त्यांना ऐकवली...
आदिवासी बांधवा
उठ!
घे मोकळा श्वास
पसरव तुझे बाहू
आणि
लुट तू
जीवनाची सारी संपत्ती
पण उठ
आदिवासी बांधवा
उठ!
कुडाची झोपडी सोड
जंगलातून बाहेर बघ
आत्ता वेळ आलीय
ओळख
बहुमोल हि वेळ
अरे तू म्हणशील
तसाच होवू शकेल
तुझ्या जन्माचा प्रवास
पण तू उठ
आदिवासी बांधवा
उठ!
होवू दे रे जाण
कसा सोकावलाय काळ
तू आहेस रे विजेता
पण तू उठ
आदिवासी बांधवा
उठ!
आत्ता एक लक्षात ठेव
सुंदर तुझे स्वच्छंदी जीवन
अडचण वाटतेय
जंगलाच्या ठेकेदारांना
म्हणून तू उठ
आदिवासी बांधवा
उठ!
निसर्गातील पक्षांगत
घे भरारी
पण विकास करील कोणी
दुख सारील कोणी
यावर विश्वास ठेवू नकोस
तू आहेस निर्मळ  झरा
पण तू उठ
आदिवासी बांधवा
उठ!
सुंदर
संपन्न
संस्कृतीसवे
तू उठ
आदिवासी बांधवा
उठ!

अशा प्रकारे जागतिक आदिवासी दिवस ख-या अर्थाने कुठे तरी आदिवासी विचारांनी साजरा करू शकलो या समाधानाने हे सर्व इथे मांडत आहे. हा सर्व सोपस्कार इथे मांडण्यापाठीमागे एकच उद्दिष्ट कि असे उपक्रम अधिकाधिक प्रमाणात सादर झाले पाहिजे. त्यासाठी आपल्या मुलांनी पुढाकार घेतला पाहिजे.

जय आदिवासी
आपणा सर्वांना जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

Post a Comment

2 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. बिरसा मुंडा यांचा उलेख का नाही?

    ReplyDelete

Top Post Ad

Below Post Ad