रयतेचा पोटच्या पोराप्रमाणे सांभाळ करणारा राजा!
राजर्षी शाहू महाराज या नावाची अख्ख्या महाराष्ट्राला ओळख आहे. त्यामुळे त्यांची नव्याने ओळख करून देण्याची गाज नाही, पण खंत ही आहे की आजची तरुण पिढी त्यांना केवळ नावाने ओळखते. त्यांची कार्ये, त्यांनी मांडलेले विचार यांची त्यांना म्हणावी तितकी माहिती नाही. वाळीत टाकल्याप्रमाणे जगणाऱ्या दलित समाजाच्या त्या काळी खंबीरपणे पाठीशी उभ्या राहणाऱ्या या लोकनायकाची, जाती पातीच्या अंधाऱ्या जगात पुन्हा अडकत जाणाऱ्या महाराष्ट्र देशाला आज पुन्हा नव्याने ओळख करून देण्याची गरज आहे.
राजर्षी शाहू महाराज म्हणजेच चौथे शाहू महाराज होत. महाराजांचा जन्म २६ जून १८७४ चा! कागलच्या घाटगे घराण्यातील अप्पासाहेब आणि राधाबाई यांच्या पोटी यशवंत या नावाने महाराजांनी जन्म घेतला. तेव्हा कोल्हापूरामध्ये राजे चौथे शिवाजी महाराज कारभार पाहत होते, पण दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूपश्चात १७ मार्च १८८४ रोजी चौथ्या शिवाजी महाराजांच्या पत्नी आनंदीबाई यांनी यांनी यशवंताला दत्तक घेतले आणि नव्याने त्यांचे ‘शाहू’ असे नामकरण केले.
त्यानंतर लगेचच २ एप्रिल १८९४ रोजी त्यांचा राज्यारोहण समारंभ पार पडला आणि शाहू कोल्हापूर संस्थानाचे राजर्षी शाहू महाराज झाले. शाहू महाराजांना ‘राजर्षी’ ही उपाधी कानपूरच्या कुर्मी क्षत्रिय समाजाने दिली होती. ज्या दिवसापासून शाहू महाराजांनी पदभार स्वीकारला तेव्हापासून १९२२ सालापर्यंत त्यांनी तब्बल २८ वर्षे कारभार करत कोल्हापूर संस्थानात रयतेचे राज्य निर्माण केले.
शाहू महाराजांच्या मनात सामान्य जनतेबद्दल अतिशय कळवळा होता. विशेष करून बहुजन समाजाची तत्कालीन स्थिती सुधारणे हे त्यांचे प्राथमिक ध्येय होते. त्यादुष्टीने पाउले टाकीत त्यांनी सर्वप्रथम त्या समाजातील घटकांना साक्षर करण्याचे शिवधनुष्य उचलले. समाजात शिक्षणाचा मोठ्या स्तरावर प्रसार केला.
संपूर्ण कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मुख्य म्हणजे मोफत केले. अस्पृश्यता निर्मुलन हे देखील त्यांच्यासमोरचे मोठे ध्येय होते. त्यासाठी म्हणून त्यांनी उच्च वर्णाच्या आणि अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा चालवण्याची जी पद्धत होती ती बंद करायला लावली.
मागासलेल्या वर्गांना विकासाच्या प्रवाहात आणायचे असेल तर त्यांच्यासाठी राखीव जागांची तरतूद केली पाहिजे, अशी कल्पना महात्मा जोतिबा फुले यांनी मांडली होती, ही कल्पना शाहू महाराजांनी प्रत्यक्षात उतरवली आणि ६ जुलै १९०२ रोजी त्यांनी कोल्हापूर संस्थानातील मागास जातींना ५० % जागा राखीव करण्याचा ऐतिहासिक निर्णय जाहीर केला.
समाजातील सर्व घटकांना समानतेने वागवावे असा जाणून त्यांनी आदेशच जाहीर केला. शाळा, दवाखाने, पाणवठे, विहिरी, सार्वजनिक इमारती सर्वांसाठी खुल्या केल्या. डेक्कन रयत असोसिएशन ही देखील शाहू महाराजांचीच देण.
ShareCopy
१९१७ साली शाहू महाराजांनी विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता देत पुनर्विवाहाचा कायदा केला आणि खऱ्या अर्थाने समाजाला पुरोगामी युगाची दिशा दाखवली. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी कृषीक्षेत्रावर देखील विशेष भर दिला.
‘शाहू छत्रपती स्पिनिंग अँड वीव्हिंग मिल’, शाहुपुरी व्यापारपेठ, शेतकऱ्यांसाठी सहकारी संस्था,शेतीविषयक तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी ‘किंग एडवर्ड अॅरग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट’ यांसारख्या संस्था शाहू महाराजांनी स्थापन केल्या. राधानगरी धरणाची उभारणी करून आणि शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करून त्यांनी बळीराजाला सक्षम केले.
ShareCopy
डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणाकरता आणि मूकनायक वर्तमानपत्राच्या उभारणीमध्ये शाहू महाराजांनी स्वत:हून सहकार्य केले. केवळ समाज सुधारणेपुरता राज्यकारभार न करता शाहू महाराजांनी कला क्षेत्राला देखील राजाश्रय देत आपण संपूर्ण समाजाचे राजे असल्याचे सिद्ध केले. संगीत, चित्रपट, चित्रकला व लोककला या कलांचा विकास आणि विस्तार त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात घडवला.
अश्या या थोर राजाने ६ मे १९२२ रोजी अखेरचा श्वास घेतला, त्या दिवशी संपूर्ण समाज जणू पोरका झाला. पण त्यांचे विचार आणि कार्ये मात्र नेहमीच आपल्या समाजाला प्रेरणा देत राहिले आहेत आणी यापुढेही देत राहतील हे मात्र नक्की!
जनतेच्या या राजाला इनमराठी तर्फे मानाचा मुजरा !!!
Very good information
ReplyDeleteMst
ReplyDelete