Type Here to Get Search Results !

सूत्रसंचालन स्वागत समारंभाबाबत महत्वाच्या टीप

सूत्रसंचालन स्वागत समारंभाबाबत महत्वाच्या टीप  महाराष्ट्रातील तमाम सूत्रसंचालक बंधू- भगिनींनो... नमस्कार.


आज मी आपल्याला स्वागत समारंभाबाबत एक महत्वाची टीप सांगणार आहे.


            ब-याचदा आपण एखाद्या अनोळखी ठिकाणी सूत्रसंचालन करत असताना, कार्यक्रमपरत्वे आपल्याला सर्वात मोठी आणि महत्त्वाची जबाबदारी पार पाडावी लागते आणि ती यशस्वी झाली की मग जग जिंकल्याचा आनंद प्राप्त होतो. ती गोष्ट म्हणजे *स्वागत समारंभ'*.

           कारण एखादा पाहुणा जरी स्वागत व्हायचा राहिला तरी निवेदकाने कितीही चांगले निवेदन केले तरी त्यालाच नावे ठेवली जातात. बरोबर ना?

           एकदा तर आयोजकांच्या यादीत मंडळाच्या अध्यक्षाचे नावच नव्हते. माझी पत्नी प्रतिभा क्षीरसागर-कदम व माझ्याकडे त्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन होते. कार्यक्रम होण्यापूर्वी वेळीच ही गोष्ट लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला. असो.

      सूत्रसंचालकाने केव्हाही कार्यक्रमाचे स्वरूप पाहून किमान एक तास आधीच नियोजित स्थळी उपस्थित रहावे. असे केल्याने आपण त्या वातावरणाशी एकरूप होतो शिवाय स्वागत समारंभाचे स्वरूप... ईशस्तवन, स्वागतगीत सादर करणारा समूह, त्याचे नाव,त्यांना स्वागतपद्य गाण्यासाठी कोठे जागा द्यावी.. त्यांचे आगमन,निर्गमन  कोणत्या दिशेने होणार... कोण कोणाला पुष्पगुच्छ देणार.... पुष्पगुच्छ इ. देण्यासाठी व्यासपीठावर कोण असणार .... पाहुण्यांच्या स्वागताचा क्रम इ. गोष्टी ठरविणे आपल्याला सोपे जाते.

          अलिकडे पुष्पगुच्छ ऐवजी पुस्तके किंवा रोपटे देण्याची प्रथा आहे. त्याअनुरूप देण्यात येणा-या रोपट्याचा किंवा पुस्तकाचा थोडक्यात संदर्भ दिल्यास अधिक चांगले .

            उदा. देण्यात येणारे रोपटे तुळशीचे असल्यास पुढीलप्रमाणे आपल्याला बोलता येईल..." तुळस जशी तिच्या सहवासात येणाऱ्या प्रत्येकाला आरोग्यदायी व स्फूर्तीदायक ठरते अगदी तसेच एक स्फूर्तीदायक व सतत प्रेरणा देणारे व्यक्तीमत्त्व आपल्यामध्ये उपस्थित आहेत... मा. ........"

              आणखी एक महत्त्वाचे... कार्यक्रमापूर्वीच आयोजकांकडून जर आपण प्रमुख अतिथींची यादी घेतली तर वेळेवर फक्त उपस्थित पाहुण्यांच्या नावापुढे  आपण टीक करावे.

               स्टेजवर कधीकधी अनोळखी पाहुण्यांना बसण्यास सांगितले जाते मात्र त्यांचे नाव आपल्याला माहिती नसते अशावेळी त्या पाहुण्यांचे नाव घेतले नाही तर ते योग्यही दिसत नाही. अशावेळी आपणच प्रसंगावधान राखावे व ईशस्तवन, स्वागतगीत होईपर्यंत सर्व नावे कनफर्म करून घ्यावीत.तसेच स्टेजवर जास्त पाहुणे असले तर कार्यक्रमाचे स्वरूप पाहून एकत्रितपणे मंचावरील मान्यवरांच्या पदाचा उल्लेख करावा. उदा. मंडळाचे इतर सर्व सन्माननीय पदाधिकारी व कार्यकर्ते इ.

          याशिवाय शक्य झाल्यास नियोजित कार्यक्रमाच्या नियोजन सभेकरिता आपण आवर्जून उपस्थित राहणे खूप आवश्यक असते. असे केल्याने संपूर्ण कार्यक्रम आपल्या घरातील कार्यक्रम असल्याप्रमाणे आपण वावरतो आणि आत्मविश्वासाच्या जोरावर कार्यक्रम १०० टक्के यशस्वी होतो.

           आजची सूत्रसंचालन टीप आपल्याला नक्कीच उपयोगी ठरेल अशी अपेक्षा करतो.😀

Post a Comment

6 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. छान माहिती आहे सर

    ReplyDelete
  2. Ekdam sunder margadarshan kelat tumhi...dhanyavaad

    ReplyDelete
  3. महत्वपूर्ण माहिती दिली सर

    ReplyDelete
  4. छान माहिती दिली सर

    ReplyDelete

Top Post Ad

Below Post Ad